मुंबई – ‘नागराज मंजुळे’ अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी, अभिनेतेही आहेत. आणि त्यांच्या या कलेचा आता डॉक्टरेट या पदवीने सन्मान करण्यात आला आहे. नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या, फॅंड्री, नाळ, सैराट आणि झुंड अशा एकाहून एक चित्रपटांची निर्मिती करत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
आणि त्यांच्या याच योगदानाची दखल बॉलीवूडला देखील घ्यावी लागली. स्वतः महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासोबत ‘झुंड’ या चित्रपटात काम केलं. त्यानंतर बॉलिवूडचे प्रेक्षकही त्यांच्या प्रेमात पडले आहे. दरम्यान, नुकतंच बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही नागराज यांचं कौतुक केलं आहे. अनुराग यांनी नुकत्याच एका मोठ्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नागराज यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. तसेच, “मला एक दिवस त्याच्यासोबत कामही करायचंय’, असल्याचं अनुराग यांनी म्हंटलं आहे.
यावेळी अनुराग कश्यप नेमकं काय म्हणाला वाचा…
अनुराग यांना मुलाखतीत नागराज यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ‘तो खूप मस्त माणूस आहे. त्याने अनेक उत्कृष्ट चित्रपट दिलेत. तो खूप चांगला अभिनेतादेखील आहे. मला तर एक दिवस त्याच्यासोबत कामही करायचंय. मला त्याला माझ्या चित्रपटात कास्ट करायचंय. मला आवडेल त्याच्यासोबत काम करायला.’ असं देखील तो यावेळी म्हणाला.