मुंबई – किंग खान शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान वेब सीरिजच्या माध्यमातून मनोरंजनाच्या जगात प्रवेश करत आहे. रिपोर्टनुसार, आर्यन खान लवकरच एका वेब सीरिजमध्ये अभिनेता म्हणून नव्हे तर लेखक म्हणून पदार्पण करणार आहे. 24 वर्षीय आर्यनने वेब सीरिजची कथा लिहिण्याचे काम पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानच्या या मालिकेसाठी कलाकारांचा शोध घेतला जात आहे. तो ज्या वेबसिरीजवर काम करत आहे, त्या वेबसिरीजच्या लेखनाचे काम पूर्ण झाले आहे. कास्टिंगसाठी आर्यन स्वत: कलाकारांच्या प्रोफाइलची तपासणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
वर्षाच्या अखेरीस ही मालिका सुरू होईल
रिपोर्टमध्ये पुढे असंही लिहिलं आहे की, ‘मालिकेसाठी फक्त अशाच कलाकारांची निवड केली जावी, जे व्यक्तिरेखेला बसतील. यामुळेच आर्यन लेखनानंतर मालिकेतील कलाकारांच्या निवडीकडे लक्ष देत आहे. या मालिकेसाठी अनेक कलाकारांनी ऑडिशन दिल्या आहेत. अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा सुरू असून काही कलाकारांना शॉर्टलिस्टही करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, या वेब सीरिजचे शूटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल.’
‘शाहरुख खानने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘आर्यन खानला अभिनयात फारसा रस नाही. आर्यनला दिग्दर्शन आणि लेखनाची आवड आहे. आर्यन गेल्या चार वर्षांपासून फिल्ममेकर बनण्यासाठी मेहनत घेत आहे. लेखन आणि दिग्दर्शनाशी संबंधित बारकावे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत आहे.’
आर्यन खानच्या या वेब सिरीजचा विषय चित्रपट जगताशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेत चित्रपटसृष्टीतील विविध गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मालिकेत बिलाल सिद्दीकी हा आर्यनसोबत लेखक म्हणूनही जोडला गेला आहे. बिलालने यापूर्वी नेटफ्लिक्सच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ शोमध्ये लिखाण केले आहे. ‘जर्सी’ चित्रपटात दिसलेला अभिनेता प्रीत कमानी या वेब सीरिजचा भाग बनू शकतो, असे वृत्त आहे. सध्या सर्वांना आर्यन खानच्या या प्रोजेक्टची प्रतीक्षा आहे. लेखक म्हणून आर्यनचे टॅलेंट पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.