लॉकडाऊन नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई अटळ
पुणे – करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुढील दहा दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी त्यांचा आदेशात दिलेल्या नियमांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. दरम्यान, शहरात 7 हजार पोलिसांचा खडा पहारा मंगळवारपासून असणार आहे
डॉ. शिसवे म्हणाले, “नागरिकांमध्ये प्रबोधनासाठी पोलीस व्हिडिओ सिस्टमचा वापर करणार आहेत. चेकपोस्ट असतील, त्या ठिकाणी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची शहानिशा करण्यात येईल. यासंदर्भात पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, याची खबरदारी पोलीस घेणार आहेत.
नागरिकांनी स्वयंशिस्त आणि संयम पाळणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीला परवानगी दिली आहे, त्यासाठी डिजिटल पास देण्यात येणार आहेत. पुणे पोलीस नागरिकांना मदत करण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. प्रशासन आणि पोलिसांची भूमिका आणि कळकळ नागरिकांनी समजून घ्यावी, तसेच कायदेशीर कारवाईची वेळ येऊ न देता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही शिसवे यांनी पुणेकरांना केले आहे.