कार्यमालकासह मंगल कार्यालय मालकावर गुन्हा दाखल
जुन्नर (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात सावरगाव येथे गाजेलेल्या लग्न सोहळ्यात नियमापेक्षा अधिक व्यक्ती जमविल्याच्या कारणावरून अखेर जुन्नर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 13) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही बाजूंचे कार्यामालक आणि मंगल कार्यालय मालक यांच्यावर साथ प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सोहळ्यातील वर-वधूवरांसह 23 जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर लग्नाला उपस्थित असलेल्या बहुसंख्य पाहुण्यांनी आपली करोना चाचणी करण्यासाठी लेण्याद्री कोविड सेंटरकडे धाव घेतली असून अनेक जण स्व क्वारंटाइन झाले आहेत. केवळ 50 व्यक्तींची परवानगी असताना सुमारे 350 व्यक्ती या कार्यक्रमास हजर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून भविष्यातही तालुक्यातील आकडा वाढण्याची शक्यता आहे.
डीजे मालक पोलिसांच्या ताब्यात
ओतूर (प्रतिनिधी) – लग्नानंतर हिवरे बुद्रुक येथे डीजेच्या तालावर काढलेली वरात डीजे मालकाला महागात पडली आहे.त्याच्यावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
हिवरे बुद्रुक गॅसवर; 21 जणांचा अहवाल प्रतीक्षेत
ओझर (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात गाजलेल्या “लग्नाची एक गोष्ट’ याचा थेट संबंध हिवरे बुद्रुक गावाशी आहे. याच गावातील वऱ्हाडीमंडळीतील चौघांना करोनाची लागण झाल्याने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र व या गावाचा बाजूचा 5 किमी परिसर हा बफर झोन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, या चौघांच्या संपर्कात आलेल्या 21 जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याने संपूर्ण गाव गॅसवर आहे.
संबंधित बाधितांच्या संपर्कात लग्नामुळे गावातील अनेक लोकांचा संपर्क आला होता हे सर्वेक्षणात आढळून आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी रविवारी (दि. 12) गावातील 21 लोकांना तपासणीसाठी लेण्याद्री येथील कोविड सेंटर येथे पाठवले होते. या सर्वांचे नमुने पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवले असून त्याचा अहवाल काय येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या कुटुंबीयांच्या संपर्काकात असलेल्या आणखी 3 जणांना गेली तीन दिवस ताप, सर्दी व कफ याचा त्रास जाणवत असल्याने त्यांना सोमवारी (दि. 13) तपासणीसाठी लेण्याद्री येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली. संबंधित ग्रामस्थांना त्रास होत असल्याने गावातील अनेक जणांचे धाबे दणाणले असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, रुग्ण आढळतात येत आल्याने ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली असून, लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे.