पुणे -अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीचा सोमवारी सकाळी अकरा वाजता निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटात 14 विद्यार्थ्यांनी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटात 14, असे एकूण 28 विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाईल मिळवले. यात सर्वाधिक पुण्यातील सात विद्यार्थी आहेत.
राज्य सीईटी सेलमार्फत एमएचटी-सीईटी घेण्यात आली. बारावी निकालानंतर अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश सीईटीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांची सीईटी 9 ते 20 मे या कालावधीत घेण्यात आली. एकूण 197 केंद्रावर परीक्षा झाली. त्यात 181 केंद्र महाराष्ट्रात, तर 16 केंद्र महाराष्ट्रबाहेर होते.
पीसीएम ग्रुपसाठी एकूण 3 लाख 33 हजार 41 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 13 हजार 730 विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. पीसीबी ग्रुपसाठी 3 लाख 3 हजार 48 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 77 हजार 400 विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. दोन्ही ग्रुपसाठी एकूण सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख 91 हजार 130 इतकी असून, सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 92.93 टक्के इतकी आहे.
राज्य सीईटी सेलने पीसीबी व पीसीएम या ग्रुपमध्ये 100 पर्सेटाईल मिळविलेल्या एकूण 28 विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जिल्हानिहाय आणि संवर्गनिहाय टॉपर विद्यार्थ्यांचा एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर केला आहे. यात खुल्या गटात एकूण 28 विद्यार्थ्यांमध्ये पुण्यातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भटक्या जमाती (एनटी-सी) संवर्गात आणि डीटी-व्हीजे संवर्गात पुण्यातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. पुण्यातील टॉपर विद्यार्थी संवर्गनिहाय एचएचटी-सीईटी निकालात आठ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. यात सात विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहे. एक विद्यार्थ्याला 99.92 पर्सेंटाइल मिळाले आहेत. संवर्गनिहाय निकालात खुल्या गट : सेजल राठी, आर्या तुपे, अपूर्वा महाजन, मृण्मयी भालेराव, तनीष चुडीवाल, कृष्णा काब्रा. एनटी-सी गट : अबोली माळशिकारे. डीटी-व्हीजे गट : अंकित केसरोड.