भोर (पुणे) – भोर संपूर्ण शहर रविवार (दि. 13) ते शनिवार (दि. 19) या काळासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले असून, शहरात पुन्हा सात दिवसांचे लॉकडाऊन सुरू करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली.
भोर शहरातील करोनाबाधितांची संख्या रोज वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील करोना बाधितांचा आकडा दीडशेच्या वर गेला असून यात 65 शासकीय, निमशासकीय, तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश असून, शहरातील बहुताश वॉर्डात, पेठांत, गल्ल्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याची गंभीर दखल घेऊन आमदार संग्राम थोपटे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आज (दि. 11) तातडीची बैठक बोलावली होती. आमदार थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील वाढत्या करोना आजाराच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली आणि भोर शहरात रविवार (दि. 13) ते शनिवार (दि. 19) या 7 दिवसांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता भोर शहर कडकडीत बंद करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. या सात दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे. बंदच्या काळात फक्त रुग्णालये आणि औषधांची दुकाने चालू राहतील, तसेच करोनाची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाला पुढील निर्देश देण्यात येणार आहेत.
या बैठकीस भोरचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार थोरात, भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस निरीक्षक राजू मोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, गटनेते सचिन हर्णसकर, नगसेवक चंद्रकांत मळेकर, अमित सागळे उपस्थित होते.