-->

करोना बाधितांना बेड मिळण्यासाठी पुण्यात मुंबईचा ‘हा’ पॅटर्न

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांत सेंट्रलाइज बेड मॅनेजमेंट सिस्टिम सुरू करावी

पुणेव्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यावर महापालिकेने संबंधित व्यक्तीशी तात्काळ संपर्क साधावा. त्याच्या लक्षणांनुसार तात्काळ शासकीय किंवा खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि पिंपरीचिंचवड महापालिका क्षेत्रांत केंद्रीय खाटा व्यवस्थापन प्रणाली (सेंट्रलाईज बेड मॅनेजमेंट सिस्टिम) स्थापन करावी. जेणेकरून बाधिताला तात्काळ उपचार मिळण्यास मदत होईल, असे आदेश सामान्य प्रशासन पुणे विभागाचे उपआयुक्त संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढला आहे. भविष्यात हा संसर्ग आणखी वाढण्याची भीती असून, महापालिकेने त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, शासकीय किंवा खासगी रूग्णालयांनी बाधित व्यक्तींला स्वॅब रिपोर्ट अहवाल मिळण्यापूर्वी प्रथमत: महापालिकेला हा अहवाल द्यावा. महापालिकेने अहवाल प्राप्त होताच सक्षम अधिकाऱ्यांमार्फत संबधित बाधित व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी. या यंत्रणेच्या माध्यमातून बाधित व्यक्तीची परिस्थिती काय आहे, त्याला लक्षणे कोणती आणि त्याची तीव्रता याची माहिती घ्यावी.

त्यानंतर लक्षणे नसलेल्या आणि त्रास होत नसलेल्या व्यक्तीला होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटरचा पर्याय द्यावा. ज्या बाधितांना ऑक्सिजन किंवा व्हेंटीलेटरची गरज असल्यास तात्काळ शासकीय किंवा निमशासकीय रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही महापालिकेने करावी. कारण, सध्या बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे नातेवाईकांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. नक्की बेड कोठे उपलब्ध आहेत, याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यामुळे पुणे आणि पिंपरीचिंचवड महापालिका क्षेत्रात केंद्रीय खाटा व्यवस्थापन प्रणाली (सेंट्रलाइज बेड मॅनेजमेंट सिस्टिम) स्थापन करावी. यामुळे बाधिताला बेडसाठी शोधाशोध करावी लागणार नाही, असे या आदेशामध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.