बंगलुरू – कर्नाटकातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री एम. व्ही. राजशेखरन यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले ते 91 वर्षांचे होते. शेती व ग्रामविकासाचे तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जात होते. या दोन्ही क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांनी आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून आपल्या राजकीय क्षेत्रात कार्य केले असून त्यांनी आयुष्यभर साधेपणा जपला आणि त्यांच्यात मोठी प्रगल्भता होती अशा शब्दात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एन. निजलिंगप्पा यांचे जावई होते. त्यांनी ग्रामविकासाचे प्रशिक्षण देणारी संस्थाही कर्नाटकात स्थापन केली होती. कर्नाटकातील कनकपुरा मतदार संघातून ते लोकसभेवर निवडून जात असत. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात नियोजन व सांख्यकि विभागाचे मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी आयुष्यभर मूल्याधिष्ठीत राजकारण केले असेही येडियुरप्पा यांनी त्यांना आदरांजली वाहताना नमूद केले.