मंचर (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी, ता. आंबेगाव येथील शिवनेरी निवासस्थानावरुन व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधाला. समस्या समजावून घेत त्यांना विविध सूचना केल्या.
आढळराव पाटील यांनी आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, हवेली, भोसरी व हडपसर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चेसाठी निमंत्रित केले. सुमारे 50 पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेत आपापल्या भागात करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांना शेती कामाच्या व मालवाहतुकीच्या अडचणी, शिवभोजन उपक्रम, रेशनिंगमध्ये होणारा काळाबाजार, गावामध्ये निर्जंतुकीकरण करणे, गावातील गोरगरिबांना जेवण उपलब्ध करणे आदी विविध समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच आपण स्वतः यासाठी आवश्यक लक्ष घालणार असल्याची ग्वाही यावेळी आढळराव पाटील यांनी दिली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून व शिवसेना भवनाकडून येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही आढळराव पाटील यांनी केले.
चर्चेमध्ये मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, खेडचे माजी आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख माउली कटके, इरफान सय्यद, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, अरुण गिरे, माउली खंडागळे, सचिन बांगर, देविदास दरेकर, निलेश मुटके, अनिल काशीद, पोपट शेलार, सुनील बाणखेले, हडपसर विधानसभेचे समीर तुपे, सचिन तुपे, जयश्री पलांडे, बापू शिंदे, शिरुरचे राम गावडे, विजया शिंदे, श्रद्धा कदम, दीपेश परदेशी, शिवाजी राजगुरू आदी सहभागी झाले होते. लॉकडाऊनच्या काळामध्ये आठवड्यातून किमान दोन वेळा व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातूम शिरुर लोकसभा मतदार संघातील परिस्थितीवर लक्ष ठेवून समस्या कसोशीने सोडविण्यात येतील, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.