-->

भुसार बाजार उद्यापासून सुरू

पुणे – मार्केट यार्डातील भुसार बाजार येत्या बुधवारपासून (दि.15) पुन्हा सुरू होणार आहे. पोलीस प्रशासन आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दी पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आत्तापर्यंत दोनदा भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय चेंबरने घेतला होता. पहिल्यांदा प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे बंद मागे घेण्यात आला. त्यानंतर करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पूर्व विभाग महापालिकेने सील केला आहे. त्यावेळी बाजार घटकांनी केलेल्या विनंतीमुळे फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग बंद करण्यात आला. त्यावेळी भुसार विभाग सुरू ठेवण्याची भूमिका चेंबरने घेतली होती. त्यानंतर बाजारात कामावर येणाऱ्या कामगारांना, ट्रकमधून माल घेऊन येणाऱ्या ट्रकचालकांना पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याने चेंबरने सोमवारपासून अनिश्‍चित काळासाठी भुसार बाजार बंद ठेवण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी शहरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती निर्माण झाली होती.

त्यानंतर पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी कामगार आणि ट्रकमधून माल आणणाऱ्या ट्रक चालकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख आणि डीडीआर कुंभार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पोलिसांनी हे आश्‍वासन दिले. त्यानंतर चेंबरने पुन्हा बाजार सुरू करण्याची भूमिका घेतली, असून बुधवारपासून सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत भुसार बाजार सुरू राहणार आहे, असे ओस्तवाल यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.