पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीएमएल) अत्यावश्यक सेवेसाठी संचलन सुरू केलेल्या बसमध्ये पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, आता सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून आलेल्या विनंती पत्रामुळे सुरक्षा रक्षकांना पीएमपीच्या अत्यावश्यक सेवेसाठी सोडण्यात आलेल्या बसमध्ये मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद करण्यात आली. यामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेले डॉक्टर, पोलीस यांना पीएमपी बसने मोफत प्रवास असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले.
अनेक सुरक्षा रक्षकांना पोलीस प्रशासनाकडून रस्त्यातच रोखले जात होते. सुरक्षा रक्षकांना अत्यावश्यक सेवेतील बसमध्ये प्रवेश करण्यास मुभा मिळावी, ही विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पुणे जिल्हा सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र पाहूनच बसमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.