पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) येथील संशोधकांच्या नेतृत्वाखालील सौर भौतिक शास्त्रज्ञांच्या गटाला सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट रेडिओ दुर्बिणीचा वापर करत सूर्याची अपवादात्मक तपशिलवार रेडिओ प्रतिमा तयार करण्यात यश आले आहे.
सूर्याची अभूतपूर्व अचूक आणि लहान वैशिष्ट्ये यावेळी दिसून आली आहेत. कमी वेळेत प्रतिमा निर्माण करणारी ही जगातील सर्वोत्तम दूरदर्शक सुविधा मानली गेली आहे. या संशेाधनामुळे सौर भौतिकशास्त्रात एक नवील दालन उघडेल, असे संशोधनातील सहभागी खगोल शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले.
प्रमुख वैज्ञानिक डाॅ. कंसाबनिक म्हणाले की, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी विशेषतः रेडिओ तरंग लांबीवर आश्चर्यकारकपणे आव्हानात्मक स्त्रोत आहे. रेडिओ उत्सर्जन सूर्याच्या क्षीण वातावरणातून उद्भवते. सुर्याचा हा प्रदेश कोरोना म्हणून ओळखला जातो. जो केवळ ग्रहणाच्या वेळीच उघड्या डोळ्यांनी दिसतो. कोरोना हे पृथ्वीच्या पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटनेचे जन्मस्थान आहे. ज्याला आपण आता स्पेस वेदर म्हणून संबोधतो.
वैज्ञानिक डॉ. मोंडल म्हणतात की, सूर्याचे चित्र काढण्यासाठी अनेक गुंतागुंती आहेत. यातील एक म्हणजे सूर्याचे रेडिओ उत्सर्जन केवळ वेळेत फार लवकर बदलत नाही, तर ते एका तरंगलांबीपासून जवळच्या तरंगलांबीमध्ये नाट्यमयरित्या बदलू शकते. हे असे म्हणण्यासारखे आहे की, रेडिओ तरंगलांबीवरील सूर्य एका सेकंदापेक्षा कमी वेळात आणि जवळच्या समान रंगाच्या छटांमध्येही खूप वेगळा दिसू शकतो.
दरम्यान, सूर्याची अभूतपूर्व तपशीलवार प्रतिमा बनवण्याची मीरकॅटच क्षमता या निरीक्षणामुळे दिसून आली आहे. या संशोधनातून मिळालेल्या प्रतिमाद्वारे मीरकॅट दूरदर्शक अभूतपूर्व तपशीलवार सौर प्रतिमा प्रदान करु शकते. या संशोधनात डाॅ. कंसाबनिक, डॉ. मोंडल, प्रा. ओबेराॅय आणि डाॅ. देवज्योती कंसबनिक या वैज्ञानिकांचा समावेश आहे.
दरम्यान, रेडिओ दूरदर्शक त्यांच्याद्वारे सर्वोत्कृष्ट प्रतिमा तयार करण्यासाठी काही मिनिटे किंवा तासांपर्यंत कमकुवत रेडिओ स्रोतांकडे टक लावून पाहण्यासाठी विकसित केलेले आहेत. यामुळे सूर्यासाठी निर्माण होणाऱ्या प्रतिमा अस्पष्ट होतात. जसे की वेगात असलेली गाडी ठराविक फोटोंमध्ये अस्पष्ट दिसते.
या समस्येला सामोरे जाण्यासाठी केवळ मोठ्या फ्रेम रेटसह चित्रपट तयार करणे आवश्यक नाही, तर सौर वातावरणात काय घडत आहे याचे तपशीलवार चित्र तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने तरंगलांबींवरील निरीक्षण करणे आवश्यक आहे.