पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमपीएमएल बसमध्ये लावल्या जाणार्या अनधिकृत जाहीरातींमुळे पीएमपीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या फुकट्या जाहीरातदारांना लगाम घालण्यासाठी पीएमपी प्रशासनाने अशा जाहिरातदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तशा आशयाचा मजकूर बसमध्ये चिकविण्यात आला आहे.
पीएमपीला उत्पन्नासाठी बसस्टॉपवरील जाहीरात, बसचा बाह्यभाग व अंतर्गत भागातील जाहीरातींपासून उत्पन्न मिळते. तर पीएमपीच्या ताफ्यातील अन्य बसच्या तुलनेत वातानुकुलीत बसच्या अंतर्गत व बाह्य भागावर जाहीरातींकरिता पुरेशी जागा उपलब्ध होत असल्याने फुकट्या जाहीरातदारांनी या बसकडे आपला मोर्चा वळविला आहे.
बसमधील प्रवाशांना धरण्यासाठीचे हॅन्डल्स, सीच्या मागील भाग व बसमध्ये उपलब्ध ठिकाणी हे जाहीरातदार आपल्या फर्मची फुकटात जाहीरात करत आहे. त्यामुळे पीएमपीला लाखो रुपयांचा फटका बसत आहे.
या फुटक्या प्रवाशांना आवर घालण्यासाठी आता पीएमपी प्रशासनाने पावले उचलली आहेत. पीएमपी प्रशासनाच्या परवानगीशिवाय बसमध्ये जाहीरात करणार्या फर्मवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे.