पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्य़ाचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना आज प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. परिणामी, कामानिमित्त बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना पुन्हा घरचा रस्ता धरावा लागला.
उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस असल्याने तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच अर्ज भरण्याव्यतिरिक्त इतर नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देणात आला नाही. सायंकाळी ०४:३०नंतर नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात आला.
त्यामुळे सकाळी जे नागरिक कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांनी आता पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणार आहे. काही नागरिक गेटच्या बाहेरच आत सोडण्याची वाट पाहात थांबले होते. दरम्यान, आज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरही मोठी गर्दी होती