सातारा -जिल्ह्यातील चार तालुक्यांत लंपी स्किनचा प्रादुर्भाव वाढला असून बुधवारी लंपी स्किनचा दुसरा बळी गेला आहे. आसू (ता. फलटण) येथील संकरित गायीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर 105 बाधित जनावरे आढळली असून खटाव तालुक्यातील बाधित जनावरांची संख्या 43 वर गेली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
वाघेरी (ता. कराड) येथे लंपी स्किन आजाराची सुरुवात झाली होती. कराडनंतर फलटण तालुक्यात व त्यानंतर सातारा तालुक्यात महिगाव, पांढरवाडी येथे बाधित जनावरे आढळून आली. बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता खटाव तालुक्यातही लंपी स्किनचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. कटगुण, कलेढोण, राजापूर, खटाव गावांमध्ये बाधित जनावरे आढळली आहेत.
बुधवारअखेर जिल्ह्यात चार तालुक्यात 105 बाधित जनावरे आढळून आली आहेत. काही दिवसांपूर्वी वाघेरी येथील बैलाचा मृत्यू झाला होता. बुधवारी आसू (ता. फलटण) येथील संकरीत गायीचा मृत्यू झाला असून पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने आसू गावास भेट दिली. कराड तालुक्यात वाघेरी येथे 11 जनावरे बाधित असून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. फलटण तालुक्यात खामगाव 3, जिंती 5, फडतरवाडी 3, चव्हाणवाडी 6, पाडेगाव 6, सोनवडी 3, कुरवली बुद्रुक 7, धुळदेव 1, सातारा तालुक्यात कोडोली (पांढरवाडी) 8, महागाव 9, खटाव तालुक्यात अनपटवाडी 22, मानेवाडी 5, मोराळे 5, धोंडेवाडी 5, राजापूर 2, खटाव 2, कलेढोण 1, कटगुण 1 अशी 105 बाधित जनावरे आढळून आली आहेत.
लंपी स्किनच्या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्रात पाच किलोमीटर परिसरात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 49 हजार लसींचा साठा उपलब्ध असून आणखी दोन लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. पशुपालकांनी घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
डॉ. संजय शिंदेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी