उंब्रज – गेले चार पाच महिने गायब झालेला बिबट्या पुन्हा दिसू लागल्याने रात्री अपराती दुचाकी वाहनावरून प्रवास करणारे नागरिक तसेच डोंगर पायथ्याशी शेतीची कामे करणारे नागरिक भयभीत दिसत आहेत. मध्यंतरी बिबट्या चोरे गावातील वेशीवर आला होता. पालेकर वस्तीतील युवकांनी त्याला गलका करुन हुसकावून लावला होता. दरम्यानच्या काळात वनविभागाने पिंजरा सुद्धा बसविला होता. मात्र त्याला यश आले नाही.
गेल्या चार ते पाच दिवसांत मरळी फाटा येथे सायंकाळ सातच्या दरम्यान एका दुचाकी चालकाला बिबट्या रस्ता पार करुन खाली शेतात गेलेला दिसला. साखरवाडी येथील एका नागरिकाला डोंगराच्या दुसऱ्या वळणावर बिबट्या दिसला. लोकांचा आवाज ऐकला की त्याने जंगलाच्या बाजूने उडी घेतली.
सध्या डोंगरात पाणी बहुतांश ठिकाणी नाही. रानडुकरे आणि वानरे तसेच इतर प्राणी पाण्याच्या शोधात दूरवर जात आहेत. बिबट्याला खाद्य मिळत नसल्याने आणि पाणी खाली सपाट भागात असल्याने बिबट्या त्या शोधात खाली शेतात व मानवी वस्तीत येत असावा, असे लोक सांगत आहेत. दोन ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बिबट्या दिसल्याने सकाळी लवकर आणि रात्री उशिरा प्रवास करणारे तसेच डोंगरालगत शेतीचे कामे करणारे नागरिक भयग्रस्त असल्याची चर्चा भागात आहे. विभागात सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.