SC on NCP – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता. काकांचा हात सोडलेल्या पुतण्याला निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व चिन्ह बहाल केले होते. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयाने आज याबाबत दिलेला निर्णय शरद पवार यांच्यासाठी कही ख़ुशी कही गम ठरला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकांमध्ये घड्याळ हे निवडणूक चिन्ह वापरण्याचा मार्ग आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह लोकसभा निवडणुकांमध्ये वापरण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात शरद पवारांसाठी कही ख़ुशी कही गम… | SC on NCP
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह आधीच अजित पवार यांना बहाल करण्यात आले होते. अशात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला मिळालेले, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार हे नाव व तुतारी हे निवडणूक चिन्ह आगामी निवडणुकांपर्यंत कायम राहते का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती.
अशातच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना, शरद पवार गटाला देण्यात आलेले नाव व चिन्ह त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये वापरण्यात येईल असा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार हे नाव व तुतारी हे चिन्ह टिकण्याबाबतची साशंकता दूर झाली आहे.
निकालामुळे अजित पवार यांच्याकडे घड्याळ कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याने शरद पवार गटाला फटका बसला असला तरी नवे चिन्ह कायम राहणार असल्याचा दिलासाही मिळाला आहे.
बारामती तुतारी विरुद्ध घड्याळ? | SC on NCP
पुतणे अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरोधात भूमिका घेत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर यंदा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. येथून शरद पवार यांच्या कन्या व अजित पवार यांच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे खासदार आहेत.
बहिणीविरोधात अजित पवार उमेदवार देणार का, अशी चर्चा सुरु होती. मात्र अजित पवार यांनी आपण बारामती येथून उमेदवार देणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. बारामती येथून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चारचा सुरु आहे.
हा सामना झाल्यास बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना यंदा, पवारांची सून की पवारांची लेक ही निवड करावी लागणार आहे.