वाई – संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सानिध्यात शुक्रवार, 31 रोजी सायंकाळी पाच ते साडेआठ या वेळेत वाई-सुरूर रोड, डी मार्ट शेजारील मैदानावर निरंकारी सत्संग सोहळा होणार आहे. या सत्संग सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सातारा जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी दिली.
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सध्या महाराष्ट्राच्या कल्याण यात्रेवर असून नुकताच नाशिक येथील महाराष्ट्राचा 53 वा तीन दिवसीय समागम समाप्तीनंतर त्यांचे शुक्रवार, 31 रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. या आगमनाच्या वृत्ताने झोनमधील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवता आणि विश्वबंधुत्व स्थापित करण्याच्या हेतूने या विशेष सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे निरंकारी मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.