सातारा :- शहरातील पोवई नाका येथील शिवतीर्थाचे काम करताना ते ऐतिहासिक दिसेल या प्रमाणे करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
पालकमंत्री देसाई यांनी सातारा शहरातील शिवतीर्थ तसेच हुतात्मा स्मारक व विश्रामगृहाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते.
शिवतीर्थच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले की, या कामासाठी वापरण्यात येणारा दगड चांगल्या प्रतीचा असावा. किल्ल्यांवर पूर्वी ज्या प्रमाणे बांधकामे असतं तसेच काम शिवतीर्थचे व्हावे. त्याठिकाणी आता फारशी बसवलेली आहे. ती काढून इतर कामाच्या ठिकाणी वापरण्यासाठी काय करता येईल त्याचे नियोजन करावे. पूर्ण काम दर्जेदार आणि शहरास शोभेल असे सुंदर व्हावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
हुतात्मा स्मारकाचे काम आदर्श करावे…
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी हुतात्मा स्मारकाच्या कमाचीही पाहणी केली. यावेळी युद्ध स्मरकासारखे हुतात्मा स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाचे काम आदर्श असे करावे. या ठिकाणी बगीचा तयार करावा. तसेच असलेल्या संपूर्ण जागेचा चांगला वापर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
या हुतात्मा स्मारकामध्ये दुसऱ्या महायुद्धापासूनच्या शहीद जवानांची नावे कोरण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, निम लष्करी दलामधील शहीद जवान व अधिकारी यांची नावे कोरण्यात येणार आहेत. एक आदर्श युद्ध स्मारक उभे राहणार आहे.