ढेबेवाडी – कुसूर, ता. कराड येथील ऋतुराज दिलीप देशमुख या युवकाचा ढेबेवाडी, ता. पाटण येथे खून केल्याप्रकरणी अक्षय दिलीप देशमुख यांच्या फिर्यादीवरून तिघांवर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि ढेबेवाडी पोलिसांनी त्वरेने हालचाली करून, वैभव उत्तम काळे (रा. मालदन, ता. पाटण), उमर अमीरखान मुल्ला आणि शुभम प्रकाश खेडेकर (दोघे रा. ढेबेवाडी, ता. पाटण) यांना अटक केली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून संशयितांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऋतुराज देशमुख हा ढेबेवाडी येथील उमा महेश बारमध्ये सोमवारी (दि. 18) रात्री 9.30 च्या सुमारास बसला होता. त्यावेळी वैभव काळे, उमर मुल्ला व शुभम खेडेकर यांनी तेथे जाऊन ऋतुराजच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची फिर्याद अक्षय दिलीप देशमुख यांनी दिली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पाटणचे पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, ढेबेवाडीचे सपोनि अभिजित चौधरी व त्यांच्या पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. विवेक लावंड यांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयितांचा शोध घेण्याचा सूचना या पथकांना दिल्या. या पथकांनी घटनास्थळी आणि परिसरातील लोकांकडे चौकशी केली. त्यातून तिन्ही संशयित पुण्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. अभिजित चौधरी, पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुणे येथे सापळा रचून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, जुन्या भांडणाच्या कारणावरुन ऋतुराजचा खून केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, ढेबेवाडीचे सपोनि अभिजित चौधरी, कराडचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पतंग पाटील, पोलीस अंमलदार मोहन नाचन, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, शिवाजी भिसे, केतन शिंदे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, चालक विजय निकम, ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार विकास सपकाळ, प्रशांत चव्हाण, अजय माने, प्रशांत चव्हाण, संताजी जाधव, माणिक पाटील, प्रशांत माने, सौरभ कांबळे, सरिता पवार, कराड शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार शशी काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी ही कारवाई केली.