सातारा – येथील लोणार गल्लीत महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये प्लॅस्टिकचा पुतळा ठेवून, त्यावर साडी घालणार्या रोहित संजय धंगेकर, सई तानाजी माने, कविता संजय धंगेकर आणि एक विधिसंघर्ष बालक (रा. रविवार पेठ, चुना गल्ली) यांना सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 डिसेंबर रोजी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रविवार पेठेतील लोणार गल्लीमधील महिलांच्या स्वच्छतागृहात अज्ञातांनी खोडसाळपणे महिलेचा पुतळा साडी घालून ठेवला होता. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीती पसरली होती. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली होती.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना या घटनेचा छडा लावण्याचा आदेश दिला होता. या घटनेची माहिती घेऊन, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी या कृत्याची कबुली दिली. महिलांमध्ये भीती निर्माण करण्याच्या हेतूने हा पुतळा स्वच्छतागृहात ठेवल्याचे संशयितांनी सांगितले.