सातारा – सातारा पालिकेच्या वतीने पोवई नाका परिसर “नो फ्लेक्स’ झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या नियमाचे कोणीही पालन करीत नाही. सण, उत्सव व शुभेच्छांचे महाकाय फ्लेक्स या ठिकाणी लावले जात असून शिवतीर्थाचा संपूर्ण परिसर या अनधिकृत फ्लेक्समुळे झाकोळला जात आहे. पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीदेखील या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी, शिवरायांच्या पुतळा परिसरात फ्लेक्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
शिवतीर्थ व परिसराचे पावित्र्य जपले जावे, यासाठी सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत शहरातील पाच ठिकाणे “नो फ्लेक्स झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या ठिकाणी फ्लेक्स लावण्यास संबंधितांवर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत कारवाई करून प्रतिफ्लेक्स दहा हजार रुपये सेवा शुल्क वसूल करण्याचा निर्णयही घेण्यात आला. काही दिवस या निर्णयाची काटेकोर अमंलबजावणी करण्यात आली. मात्र, पोवई नाका व परिसराला लागलेले अनधिकृत फ्लेक्सचे ग्रहण आजतागायत सुटलेले नाही.
या ठिकाणी लावण्यात येणारे फ्लेक्स इतके मोठे आहेत की त्यापुढे शिवतीर्थाचा परिसरही झाकोळला जात आहे. पालिकेने या ठिकाणी “नो फ्लेक्स झोन’चा फलकही लावला आहे. तरीदेखील प्रशासनाला न जुमानता येथे फ्लेक्स लावणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.
शिवतीर्थ व परिसराचे पावित्र्य राखणे ही एकट्या पालिकेची नसून तमाम सातारकरांची देखील जबाबदारी आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीदेखील या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, शिवरायांच्या पुतळा परिसरात फ्लेक्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.