पुणे – पालकांसोबत दुचाकी आणि सायकलवरून येणाऱ्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती तसेच चारचाकीमध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी “सीआरएस’ प्रणालीची सक्ती करण्यात यावी, अशा सूर “लहान मुले तसेच युवककेंद्रीत रस्ते सुरक्षा’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.
जिल्हा रस्ते सुरक्षा समिती, युनिसेफ महाराष्ट्र, राइज इन्फिनिटी फाउंडेशन, पर्यावरण शिक्षण केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शासकीय विश्रामगृह येथे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत पुणे व पिंपरी चिंचवड मनपा, पीएमपी, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आरटीओ, पोलीस, विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा अधीक्षक अभियंता बप्पा बहिर यांनीही मनोगत व्यक्त केले.
75 जणांना प्रशिक्षण
या कार्यक्रमांतर्गत 75 मास्टर प्रशिक्षकांना मुलांसाठी रस्ते सुरक्षा याविषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जे पुढे विविध घटकांना प्रशिक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही कार्यशाळा मुलांसाठी रस्ते सुरक्षाविषयीच्या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत लहान आणि किशोरवयीन मुलांसाठी सर्वसमावेशक रस्ते सुरक्षा कृती आराखडा निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यशाळेतील मुद्दे
* शाळा क्षेत्र (स्कूल झोन) नियमांची अंमलबजावणी
* रस्ते संरचना करतानाच रस्ते सुरक्षेचा विचार करावा
* स्कूलबस, कॅब यांच्या प्रभावी नियमावलीची अंमलबजावणी
* महामार्गालगत असणाऱ्या शाळांसाठी रस्ते सुरक्षेची विशेष काळजी
* रस्ते अपघाताच्या प्रथम माहिती अहवाल नोंदणी पद्धतीमध्ये सुधारणा होण्यासाठी चर्चा करण्यात आली.