पाक लष्कर प्रमुखांनीच माफी मागावी…; इम्रान खान यांची मागणी

इस्लामाबाद – आपले बेकायदेशीर अपहरण केल्याबद्दल आणि लंडन प्लॅनला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनीच आपली माफी मागावी अशी मागणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. इम्रान खान गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून वेगवेगळ्या प्रकरणी तुरुंगात आहेत.
लष्कराशी चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे इम्रान यांनी अलिकडेच सूचित केले होते. पाकिस्तानच्या ताकदवान लष्कराशी असलेले संबंध तोडून टाकले जाणार नाहीत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
दिनांक ९ मे २०२३ रोजी आपल्याला उच्च न्यायालयाच्या आवारातून अटक करणे हा लंडन प्लॅनचा एक भाग होता. पीटीआयचे सरकार पाडणे आणि शरीफ कुटुंबीयांचे सरकार स्थापन करण्याचे कारस्थान लंडन प्लॅननुसार केले गेले होते.
या बेकायदेशीर अपहरणाबद्दल जनरल आसिम मुनीर यांनी आपली माफी मागायला हवी, असे इम्रान खान यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एक स्वयंघोषित राजा, जनरल मुनीर सर्व निर्णय घेत आहे, हे देशाचे दुर्दैव आहे.
आपण आता तुरुंगात आहोत. जर आपण बाहेर असतो, तर या व्यक्तीच्या अधिकारांना आव्हान दिले असते, असेही इम्रान खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनचे महासंचालक आणि लष्कर प्रमुख नेहमी धमकीवजा राजकीय वक्तव्ये करत असतात. पाकिस्तानच्या राजकारणात सतत हस्तक्षेप करत असतात. यामुळे देशाची प्रतिमा मलीन होत असते, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.





