खंडाळा – शिरवळ, ता. खंडाळा येथे कुरियर कंपनीच्या गोडाऊनमधील मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य, अशा दहा लाख 62 हजार 696 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याप्रकरणी श्रीकांत घनवट या कंपनीच्या कर्मचार्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, शिरवळ येथे पळशी रोडवर एका अपार्टमेंटमध्ये कुरियर कंपनीचे केंद्र आहे. तेथे कुरियर वितरण व्यवस्था व्यवस्थापक आणि आठ कर्मचारी पाहतात. कुरियरमधील साहित्य गोडाऊनमध्ये ठेवण्याचे काम श्रीकांत घनवट याच्यावर होते.
पुणे, शिरवळ व कोल्हापूर येथे दि. 17 ऑक्टोबर रोजी पाठवलेले साहित्य, तेथे पोहोचले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे व्यववस्थापक आणि इतर कर्मचार्यांनी गोडाऊनची तपासणी केली असता, 31 ऑगस्ट ते 18 ऑक्टोबर या कालावधीत श्रीकांत घनवटने आयफोन, इतर मोबाइल, हार्डडिस्क, स्मार्ट वॉच, मोबाइल टॅब आदी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत मयूर शिंदे यांनी फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे तपास करत आहेत.