फलटण – ताथवडा घाटात लुटमार करणारी पाच जणांची टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद करुन लूटमारीच्या दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 16 रोजी कुरियर देणारा ऋषिकेश अनिल मिसाळ (रा. कोळकी, ता. फलटण) पुसेगाव- फलटण रस्त्यावरील मानेवाडी बस स्टॉपवर कुरियर पार्सल देण्यासाठी ग्राहकाची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी फलटण बाजूकडून दोन मोटारसायकलींवरून आलेल्या सहा लोकांनी ग्राहक असल्याचा बहाणा करून त्यास पार्सल आहे का, असे विचारले.
त्यांच्यापैकी एकाने ऋषिकेशला गाडीवरुन खाली पाडल्यानंतर दुसऱ्याने त्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. त्याचवेळी इतर चौघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्याकडील रोख 10 हजार रुपये, 15 हजार रूपयांचा मोबाइल हॅण्डसेट व विविध पार्सलमधील एकूण 27 हजार रुपये किंमतीच्या वस्तू असा 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल असणारी बॅग जबरदस्तीने घेऊन ते ताथवडा घाटाकडे मोटारसायकलवरून पळून गेले. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीसांनी पुसेगाव रस्त्यावरील सर्व हॉटेल, पेट्रोल पंप व इतर दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केले.
मानेवाडी भागातील गावांमध्ये जाऊन फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाच्या व्यक्तींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एके ठिकाणी शेतकऱ्याने त्या वर्णनाचे लोक बिबी बाजूकडे गेल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिबी व पंचक्रोशीतील सर्व परिसर पिंजून काढून अजय संभाजी मदने (वय 21, रा. डिस्कळ ता. खटाव), अक्षय संभाजी जाधव (वय 27, रा. मोळ, ता. खटाव), निखिल उमाजी बुधावले (वय 21, रा. बुधावलेवाडी, ता. खटाव), आदित्य रामदास शिरतोडे (वय 19, रा. ललगुण, ता. खटाव), आकाश प्रभाकर जाधव (वय 22 वर्ष, रा. कोरेगाव) यांना मोळ (ता. खटाव) येथील एका डोंगराच्या पायथ्याखालून व नेर येथील धरणाचे भराव्याजवळून पाठलाग करून 24 तासांचे आत ताब्यात घेतले.
अटक करुन त्यांच्याकडून दोन मोटारसायकलींसह 2 लाख 44 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. हे संशयित ताथवडा घाटात छोट्यामोठ्या चाऱ्या करत होते. यापैकी अजय मदने व निखिल बुधावले यांनी दि. 13 ऑक्टोबर रोजी वाखरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरील कामगाराला तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सागर अरगडे, प्रमोद दीक्षित व पाटील, अंमलदार योगेश रणपिसे, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे यांनी ही कारवाई केली.