पाचगणी – आगामी लोकसभेच्या दृष्टीने शिवसेनेची प्रत्येक मतदारसंघात मोर्चेबांधणी चालू झाली असून नुकत्याच झालेल्या आढावा बैठकांमध्ये या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या उपस्थितीत पाचगणी शहरप्रमुख म्हणून राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांच्या निवडीने तरुणांमध्ये चैतन्य पसरले आहे.
राहुल शिंदे यांची पाचगणी शहरप्रमुख म्हणून निवड जाहीर होताच रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्र असल्याने महाबळेश्वर-पाचगणी भागावर त्यांचे विशेष प्रेम आहे.
या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी विविध विकास कामांचे प्रयोजन त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. तसेच आगामी काळात शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक मोर्चेबांधणीच्या दृष्टीने सदस्य नोंदणी अभियान हाती घेतलेले असून सर्व प्रक्रिया स्थानिक प्रतिनिधींमार्फत सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत. यामध्ये जास्तीत जास्त सदस्य नोंदणी नागरिकांनी करावी. यावेळी आजी-माजी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.