पुणे – स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो आणि खडकवासला ते खराडी हा २५.६५ कि.मी. अंतराचा मेट्रो मार्ग अशा दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन ते केंद्र सरकारकडे पाठवले जातील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्यासंदर्भात आमदार भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत यांनी ही माहिती दिली.
स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजुरी घेईल. खडकवासला ते खराडी हा २५.६५ कि.मी.च्या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे, अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव सुसहाय्य अहवालासह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.