सातारा – जानेवारी 2023 ते माहे डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंचपदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने प्रक्रिया राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दि. 16 ते 20 ऑक्टोंबर दरम्यान सकाळी 11 ते दुपारी तीन पर्यंत नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आणि नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दि. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दि. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी तीननंतर. मतदानाचा दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दि. 6 नाव्हेंबर व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दि. 9 नोव्हेंबरपर्यंत राहील.
जानेवारी 2023 ते माहे डिसेंबर 2023 या कालावधी मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणुकीत एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्या व विघटीत झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तपशील पुढीलप्रमाणे. सातारा तालुक्यातील पाच, कराड – 16, पाटण – 26, कोरेगाव – 13, वाई – 16, महाबळेश्वर – 17, जावळी – 24, फलटण – चार, माण – चार व खटाव तालुक्यातील आठ अशा एकूण 133 ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सातारा तालुक्यातील 27, कराड -9, पाटण – 25, कोरेगाव – 10, वाई – 9, खंडाळा – 5, महाबळेश्वर – 30, जावळी – 33, फलटण – 9, माण – 3 व खटाव – 12 अशा एकूण 172 ग्रामपंचायतींच्या 249 जागांसाठी पोट निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.