पुणे – श्री देवी चतु:शृंगी मंदिर ट्रस्टने घटस्थापना आणि नवरात्रौत्सवाचे नियोजन जाहीर केले असून, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. उत्सवकाळात मंदिर 24 तास खुले असेल. नंदकुमार अनगळ आणि नरेंद्र अनगळ यांनी उत्सवाविषयी मंगळवारी माहिती दिली.
डॉ. नरेंद्र अनगळ यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी 10 आणि रात्री नऊ वाजता महाआरती होणार आहे. तसेच भजन, कीर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त, वेदपठण होणार आहे. दि. 23 ऑक्टोबरला दुपारी नवचंडी होम होणार आहे. दि. 24 रोजी सायंकाळी सीमोल्लंघनाची पालखी निघणार असून, मंदिरापासून बॅंड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह सेवेकऱ्यांचा सहभाग असेल.
तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. उत्सवात सुयोग मित्र मंडळाच्या वतीने निवारा वृद्धाश्रमातील महिलांसाठी आजीबाईंचा भोंडला होणार आहे. सुरक्षा व्यवस्था, औषध फवारणी, सीसीटीव्ही, 150 स्वयंसेवकांची नियुक्ती, अग्निशमन व्यवस्था येथे असेल.
देवीसाठी बनवली नवी आयुधे
सभामंडपाचा विस्तार, मंदिराच्या पायऱ्या, पुजारी निवास आणि ध्यान मंदिराची उभारणी ही कामे जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहेत. यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी देवीला नवी चांदीची आयुधे करण्यात आली असून घटस्थापना झाल्यावर ही आयुधे देवीला परिधान करण्यात येतील.