म्हसवड – शालेय स्तरावर सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य शिबिर राबविण्याची संकल्पना गरजेची आहे, असे मत म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भरत काकडे यांनी व्यक्त केले.
येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर उपस्थित होत्या. यावेळी डॉ. भरत काकडे म्हणाले की सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती आहे. चांगली शरीर संपत्ती जतन करण्यासाठी सकस आहार व नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.
बदलत्या घातक जीवन शैलीमुळे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. हे धोके न परवडणारे व अत्यंत खर्चिक असल्याचे डॉ. काकडे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांची मधुमेह, रक्तदाब व हिमोग्लोबिन यांसह आरोग्य तपासणी करण्यात आली. मधुमेह, हृदयविकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक सुलोचना बाबर यांनी केले. अनिल काटकर यांनी आभार मानले.