रांजणगाव पोलिसांची कारवाई
रांजणगाव गणपती – रांजणगाव औद्योगीक वसाहतीमधील पेप्सीको इंडीया होल्डींग प्रा.लि. कंपनीतील मशिनच्या चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील ११ लाख २० हजार ९८० रुपये किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य व स्कुटी मोटारसायकल जप्त केली आहे.
विजय पांडुरंग पाटील (रा. मोरगाव खुर्द, जि. जळगाव), भूषण संतोष मिस्त्री (रा. निंभोरा, मध्यप्रदेश), मुकेश पिरमु धृवे (रा. चंदनगाव, जि. छिंदवाडा, तिन्ही सध्या रा. कारेगाव), असे अटकेतील आरोेपींची नावे आहेत. यात चोरलेले साहित्य हे आरोपी सुनील मांगीलाल महाजन (रा. कारेगाव) यास विक्री केले. त्याला अटक करण्यात आलेली आहे.
स्टोअर रूममधील खिडकीचा कोयंडा तोडून खिडकीतून प्रवेश करुन ११ लाख २० हजार ९८० रुपये किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी कंपनीचे प्रवीण अशोक बारी (सध्या रा. शिरूर, मूळ रा. शिंदोणी, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली होती. ही घटना दि. १९ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान घडली होती,
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हा उघडीकस आणण्यासाठी स्वतंत्र तपास पथकाची नेमणूक करून सूचना दिल्या होत्या. पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी परिसरातील ३० ते ४० ठिकाणावरील सीसीटिव्हि चेक करून आरोपींनी जाताना वापरलेल्या स्कुटी मोटारसायकलचा तपास केला. तपास पथकाने यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला. त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. आरोपींना (दि.२६) रोजी अटक केली आहे. शिरुर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने आरोपीची ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे हे करीत आहेत.