पौड पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल
पौड – बनावट कागदपत्र सादर करून मतदार नोंदणी करणार्यांविरोधात पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिरंगुट, (ता.मुळशी) येथील मुकाईवाडी येथील मतदार यादीमध्ये बनावट विद्युत देयके, दस्त व इतर कागदपत्र ऑनलाइन सादर करून मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
जवळपास 1100 मतदारांची बनावट नोंद होणार होती; मात्र गुन्हा दाखल झाल्याने हा प्रयत्न हाणून पाडला आहे. बनावट मतदार नोंदणी करणारांविरोधात झालेली पुणे जिल्ह्यातली बहुधा ही सर्वात मोठी कारवाई असावी. त्यामुळे बनावट मतदान नोंदणी करणार्यांना यानिमित्ताने चाप बसेल अशी आशा आहे.
मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांनी याबद्दल फिर्याद दाखल केली असून यामध्ये विजय मारणे (रा.उरावडे, ता. मुळशी), अमित गुलाब शिंदे (रा. मुकाईवाडी, पिरंगुट ता.मुळशी), भाऊसाहेब देविदास मोकर (रा. उभेवाडी, पिरंगुट ता.मुळशी), शकिल अहमद, महंमद अंसार आलम (दोघे रा.मतेवाडी, पिरंगुट, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मुकाईवाडी येथे दि. 6 डिसेंबर 2023 पासून इरो नेट 2 या प्रणालीमध्ये ऑनलाइन पद्धतीने नमुना क्रमांक 6 हा अर्ज व त्यासोबत या गावचे रहिवासी नसलेल्या लोकांचे बनावट विद्युत देयके, बनावट दस्त व इतर बनावट कागदपत्रे आरोपींनी सादर केली होती. निवडणूक प्रक्रीयेमध्ये बनावट मतदान करण्याच्या हेतूने बनावट दस्ताच्या आधारे मतदान नोंदणी करण्याचा प्रयत्न केला असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सुर्यवंशी या करत आहेत.
मुळशी तालुक्यात बनावट मतदार नोंदणी करणारे अजून कोण निदर्शनास आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल.
– रणजित भोसले, मुळशी, तहसीलदार