सातारा: धोम डावा कालवा वाई एमआयडीसीलगत फुटीच्या मार्गावर

धोम पाटबंधारे विभाग कुंभकर्णी झोपेत - प्रमोद अनपट

वाई – धोम धरणाचा डावा कालवा वाई एमआयडीसीलगत गेल्या काही महिन्यांपासून फुटीच्या मार्गावर आहे. याबाबत शेतकरी, नागरिक, राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी धोम पाटबंधारे विभागाला वारंवार लेखी व तोंडी सूचना दिल्या; परंतु हा विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने कालव्याची अवस्था दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी भगदाड पडू शकणाऱ्या या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद अनपट यांनी केली आहे.

धोम पाटबंधारे विभागाने गेली कित्येक वर्षे डाव्या व उजव्या कालव्यांची डागडुजी न केल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. दरवर्षी हजारो क्‍युसेक पाणी वाया जाऊन शेतीचे नुकसान होत आहे. हे कालवे शेवटच्या घटका मोजत आहेत. तीच अवस्था कालव्यांवरील पुलांची झाली आहे. यातील बहुतांश पुलांचा पाया निखळल्याने ते कोसळले आहेत तर काही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. याचे गांभीर्य या विभागाला नसल्याने जनतेतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

धोम धरणाचे काम 1968-77 या कालावधीत झाले. शेतीच्या पाण्यासाठी डावा व उजवा असे दोन कालवे बांधण्यात आले. डावा कालवा 113 किमी लांबीचा पाणीवहन नेण्याची क्षमता 21.20 घनमीटर आहे. या कालव्यामुळे 38 हजार 439 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येते. उजव्या कालव्याची लांबी 58 किमी व पाणीवहन क्षमता 5.81 घनमीटर असून, दहा हजार 460 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येते. सातारा, कोरेगाव ते सांगलीपर्यंत बळीराजा आपल्या शेतीला या कालव्यांचे पाणी देतो.

धरण झाल्यावर 40-45 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन्ही कालव्यांची आजतागायत डागडुजी करण्यात आलेली नाही. धोम पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे दोन्ही कालव्यांना ठिकठिकाणी बेसुमार गळती लागत आहे. धरणातील पाणी कालव्यात सोडल्यावर हजारो क्‍युसेक पाणी ओढ्या-नाल्यांमधून वाया जाते. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वेगाने कमी होऊन शेतकऱ्यांचे व पर्यायाने शासनाचे मोठे नुकसान होत आहे. कालव्यांवरील पुलांचीही दुरवस्था झाली आहे.

बहुतांश पूल पडले असून, अनेक पूल कोसळण्याच्या मार्गावर आहेत. त्या त्या भागातील शेतकरी या पुलांचा वापर करतात. हे पूल पडल्याने शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. वाई एमआयडीसीला जोडणारा डाव्या कालव्यावरील पूल काही दिवसांपूर्वी पडल्याने नागरिक व कामगारांची कित्येक महिने गैरसोय झाली होती. मेणवली येथील पूल एक वर्षापूर्वी पडल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

वाई-शेलारवाडी व एमआयडीसीकडे जाणारा पूलही पाडण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने कालव्यांची व धोकादायक पुलांची तातडीने दुरुस्ती न केल्यास युवक कॉंग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनपट यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.