सातारा – कोव्हिड-19 च्या साथीमुळे उद्घाटन लांबलेल्या आणि लोकार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या, युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या मर्ढे येथील स्मारकासाठी सोलापूर जिल्ह्यातील “मित्रांगण’ या साहित्यप्रेमी गटातर्फे ग्रंथभेट आणि देणगी देण्यात आली. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात “जागतिक मराठी राजभाषा दिननिमित्त’ हा ग्रंथभेट आणि देणगी प्रदान कार्यक्रम मर्ढे येथील स्मारकाच्या इमारतीत समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
“मित्रांगण’ य समूहाचे सर्व सदस्य हे समितीचे अध्यक्ष मुल्ला यांचे बालपणीचे मित्र असून, मर्ढेकरांच्या साहित्यातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला. मर्ढेकर स्मारकामध्ये एका ग्रंथालयाचे प्रयोजन असल्याने ग्रंथप्रेमींनी यथाशक्ती ग्रंथभेट द्यावेत, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्मारक समितीचे सदस्य ऍड. अरविंद शिंगटे यांनी ही ग्रंथभेट आणि देणगी दिल्याबद्दल “मित्रांगण’च्या सदस्यांचे आभार मानले. यावेळी सरपंच शरद शिंगटे, ग्रामस्थ उपस्थित होते.