मायणी -केवळ पाच महिन्यात शंभर प्रसुतींद्वारे उद्दिष्टपुर्ती करणाऱ्या खटाव तालुक्यातील मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राने सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याबद्दल त्यांचा नुकताच सातारा येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्याचा गौरव करण्यात आला, अशी माहिती मायणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख यांनी दिली.
डॉ. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 23 ते सप्टेंबर 23 अखेर एकूण शंभर प्रसूती या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इतिहासात प्रथमच हा विक्रम नोंदविला आहे. एक वर्षासाठी 120 प्रसूतींचे उद्दिष्ट असताना केवळ पाच महिन्यात या प्रसुती करण्यात आल्या आहेत. कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत 167 केसेसचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 94 शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. तसेच दर महिन्याच्या 9 तारखेस प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत सर्व महिलांच्या रक्त तपासण्या करण्यात येत असतात. यापूर्वी या प्राथमिक आरोग्य केंद्रास सातत्याने आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
तसेच प्रजनन व बाल आरोग्य उपक्रमांतर्गत या प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्ह्यात पाचवा तर तालुक्यात दुसरा क्रमांक आला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नुस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार ताटे, आरोग्य सेविका, आशा सेविका, आरोग्य सहाय्यक, स्टाफ सिस्टर, आरोग्य सहाय्यिका गटप्रवर्तक, वाहनचालक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांचे फार मोठे योगदान आहे.