छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणार सभा; कराड-पाटण सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजन
कराड – मनोज जरांगे-पाटील हे 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान पश्चिम महाऱाष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या कालावधीत त्यांची सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सभा होणार असून कराड येथे शुक्रवार, दि. 17 नोव्हेंबरला कराड-पाटण सकल मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सायंकाळी सात वाजता ही सभा होणार असल्याची माहिती मराठा समाजाच्यावतीने समन्वयकांनी दिली.
या सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी गेले 15 दिवस तयारी सुरु आहे. सभेला एक लाख मराठा बांधव-भगिनी उपस्थिती दर्शवतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या सभेला कराड-पाटण तालुक्यासह जवळच्या कडेगाव, शिराळा, सातारा, खटाव तालुक्यातील मराठा बांधव-भगिनी येतील. मराठा समाजाच्या आचारसंहितेच्यानुसार ही सभा होणार आहे.
दरम्यान, सभेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सभा उच्चांकी गर्दीची व्हावी, यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत असल्याचेही सकल मराठा समाजाच्यावतीने समन्वयकांनी दिली.
…अशी असेल पार्किंग व्यवस्था
या सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी मसूर, विटा भागातून येणाऱ्या वाहनांसाठी शिवाजी हौसिंग सोसायटी, राम मंदिर परिसर, विठामाता विद्यालय, शिवाजी हायस्कूल परिसर, श्री हॉस्पिटलच्या समोरील मोकळी जागा या परिसरात, तसेच वाठार, रेठरे, मलकापुर, ओंड, उंडाळे, कार्वे, वडगाव हवेलीकडून येणाऱ्या वाहनांसाठी कल्याणी मैदान, बाजार समितीच्या बाजार तळ, त्याचबरोबर पाटणकडून येणाऱ्या वाहनांसाठी दैत्यनिवारणी परिसर, शासकीय विश्रामगृहाच्या समोरील परिसर व पंकज हॉटेलकडून शहरात येणाऱ्या रस्त्याच्या परिसरात सोय करण्यात आली आहे.
मोर्चाला मिळाला होता उत्स्फूर्त प्रतिसाद
मनोज जरांगे-पाटील यांना व त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे पुन्हा सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी शहरात मराठा बांधवांनी काढलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या सभेलाही प्रचंड गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहे.