सातारा, (प्रतिनिधी)- कुवेतमध्ये धम्म ग्रुपच्यावतीने फुले आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील प्रसिद्ध विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे या समारोहास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर भीम गीतांचा कार्यक्रम झाला.
नितीन चंदनशिवे यांनी आपल्या विद्रोही कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी धम्म गटाच्यावतीने वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलांना महान व्यक्तींच्या विचारांशी जोडण्यासाठी सर्व मुलांना डॉ. आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुस्तकांचे वाटप केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील आणि भीमस्तुतीच्या पठनाने झाली. त्यानंतर धम्म गटाच्या मुलांमुलींनी आणि महिलांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारोहात रंगत आणली.