पुणे – जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार पुणे शहरात सर्वाधिक महिला मतदार या हडपसर विधानसभा मतदारसंघात असून या मतदारसंघात 2 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. तर पुणे कॅण्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी महिला मतदार असून या मतदारसंघात 1 लाख 31 इतक्या महिला मतदार आहेत.
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मागील वर्षभर मतदार यादी अधिक अचूक करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन मतदारांची नाव नोंदणी, दुबार नावे कमी करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदारयादीमध्ये मतदारांचे छायाचित्र समाविष्ट करणे, पत्त्यांमध्ये बदल आदी कामे करून ही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 80 लाख 73 हजार 183 झाली आहे. जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार 42 लाख 25 हजार 918 तर महिला मतदारांची संख्या 38 लाख 46,741 इतकी आहे. तर तृतीय पंथी मतदारांची संख्या 524 इतकी आहे.