सातारा, (प्रतिनिधी)- दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर कराओके सिंगर्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने येथे झालेल्या “भूले बिसरे गीत” या गीतांच्या मैफिलीत सादर केलेल्या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. सुनील पटवर्धन, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिरीष चिटणीस, सुहाना सफर ग्रुपचे प्रमुख विजय साबळे, डॉ. सुहास पाटील, महेश बुटे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुनील पटवर्धन म्हणाले, कुठलीही कला मन प्रसन्न करते. आपल्या विविध भावना त्या कलेतून व्यक्त करता येतात. संगीतामुळे दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी होऊन मनस्वास्थ्य उत्तम राहते.
त्यामुळे संगीत हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, असे मत शिरीष चिटणीस यांनी व्यक्त केले. डॉ. सुहास पाटील, महेश बुटे यांची भाषणे झाली. मैफिलीचे सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. या मैफिलीमध्ये प्रेम गीत, विरह गीत, कवाली, सोलो गीत, द्वंद यांसारख्या गीतांचा समावेश करण्यात आला होता.
लियाकत शेख, शिल्पा चिटणीस, विजय साबळे, मिलिंद हर्षे, ममता नरहरी, अल्ताफ मुल्ला, शुभांगी मुरुडकर, शिरीष चिटणीस, मोनिका शिंदे, अरुण नाझरे, प्रज्ञा सूर्यवंशी, डॉ. लियाकत शेख, उद्धव इंगवले, संगीता सपकाळ, शुभांगी मुरुडकर, कला चंद यांनी गीते सादर केली.