सातारा – प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने टॅक्सीचालक, रिक्षाचालक यांचा दृष्टीदोष कमी करण्याच्या दृष्टीने रस्ते व परिवहन मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार सातारा कार्यालयात उद्या (दि. १३) नेत्रतपासणी तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे की महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण मोठे असून यामध्ये सदोष दृष्टीची मुख्य अडचण आहे. आॅटोरिक्षा चालक, ट्रक चालक, कॅब चालक यांचे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने रस्ते व परिवहन मंत्रालयाने विशेष पावले उचलले आहेत.
त्यादृष्टीने सातारा परिवहन कार्यालयाला विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील निरीक्षक, चालक तसेच टॅक्सीचालकांनी आपले डोळे तपासून घेण्याच्या दृष्टीने सूचित करण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयात सकाळी ११ वाजता आरोग्य तपासणी तसेच नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आरोग्य तपासणीसह सर्व चालकांचे डोळे तपासण्यात येणार आहेत. ज्यांना दृष्टीदोष आढळून येतील त्यांना त्यांच्या नंबरनुसार तात्काळ चष्मे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.