सातारा – खिंडवाडी परिसरात महामार्गावर लूटमार करण्याच्या हेतूने आलेल्या पाच जणांचा कट स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावत त्यांच्याकडून पिस्तुलांसह तीन लाख तीन हजार रूपयांचा इतर मुद्देमाल ताब्यात घेतला. संशयित महामार्ग परिसरातीलच असल्याने सातारा पोलिसांनी रात्रगस्त वाढविली आहे.
या कारवाईत दोन पिस्टल, चार जिवंत काडतुसे, सुरे, मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित अमिर सलीम शेख, अमिर इम्तीयाज मुजावर, अलिम नजीर शेख, यश सुभाष साळुंखे, अभिषेक उर्फ अबू राजू भिसे या पाच संशयिताना अटक करून त्यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भादविक ३ ९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ३, २५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईने मोठा अनर्थ टळला असून याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचे अभिनंदन केले.
याबाबत सातारा स्थानिक गुन्हे शाखेने दिलेली अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्र .४८ चे खिंडवाडी ते शिवराज फाटा जाणारे सेवा रस्त्यावरील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या झाडीमध्ये काही व्यक्ती रस्ता लुटमारीच्या हेतूने हत्यारानिशी जमले असल्याची माहिती अरुण देवकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील यांच्या पथकाला घटनास्थळी जाऊन सापळा लावण्यास सांगितले. या पथकाने शिवराज फाटा ते खिंडवाडी सेवा रस्त्यावरील वन विभागाच्या हद्दीतील जंगलात संशयितांचा पाठलाग करून लुटमारीचा कट उधळून लावत त्यांच्या मुसक्या आवळल्या. पाचही संशयित पोलीस अभिलेखावरील सराईत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यांच्याकडे अंगझडती घेत विचारपूस केली असता दोन पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन सुरे, मोबाइल असा सुमारे तीन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अरुण पाटील, अमित माने, स्वप्नील कुंभार, अमित सपकाळ, ओंकार यादव, मोहन पवार, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयुर देशमुख, शिवाजी गुरव यांनी ही कारवाई केली.