राजगुरुनगर – खेडचे महसुल अधिकारी तहसीलदार आणि प्रांत यांनी एजंटांमार्फत चुकीची कामे केली आहेत. या बोगस नोंदीचे पुरावे आपल्याकडे आहेत. ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी सादर करणार आहोत. अधिकार्यांची बाजू घेऊन माझ्यावर टीका – टिपण्णी करणारे सुपारी बहाद्दर आहेत, असा घणाघात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा उद्धव ठाकरे शिवसेनेचे खेड आळंदी विधानसभा समनव्यक अमोल पवार आणि मोईचे सरपंच व पंचायत समितीच्या तत्कालीन मोहिते गटाच्या माजी सभापती कल्पना गवारी यांचे पती पाटीलबुवा गवारी यांच्यासह काही निवडक रिंग रोड बाधक शेतकर्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर काल दि. 11 रोजी आरोप केले होते. त्यांच्या या टीकेला प्रतिउत्तर देताना पत्रकार परिषदेत आमदार दिलीप मोहिते बोलत होते.
पुणे रिंग रोडसाठी खेड तालुक्यातील मोई, चिंबळी परिसरातील इंद्रायणी नदी काठा गतच्या बारा गावांची जमीन संपादन प्रक्रिया सुरू आहे. 1600 कोटींपैकी साडेचारशे कोटी रुपयांचे वाटप शेतकर्यांना झाले आहे. नुकसान भरपाई वाटप होताना शेतकर्यांकडून अडवून रक्कम घेतली जाते, असा आरोप करून त्यावरुन खेड वकील बार असोसिएशन कडून वरिष्ठ अधिकार्यांकडे पत्र देण्यात आले. त्यात प्रांताधिकारी यांना क्लीन चीट मिळाली. त्यानंतर बाधित शेतकर्यांनी अशा प्रकारावर आक्षेप घेतला.
गुरुवारी (दि. 11) पत्रकार परिषद घेऊन त्यात माजी उपसभापती अमोल पवार, माजी सरपंच पाटीलबुवा गवारी यांनी जबाबदार धरुन आमदार मोहिते पाटील यांना टार्गेट केले. याशिवाय भूसंपादन प्रक्रिया राबवणारे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे समर्थन करीत त्यांना त्रास झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. या टीकेला उत्तर देताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अमोल पवार, पाटील गवारी यांचा समाचार घेतला.
आमदार पुढे म्हणाले अमोल पवार, पाटील गवारी व इतरांनी सुरुवातीला याच अधिकार्यांविरोधात उपोषण आंदोलन का केले हेही त्यांनी सांगावे. समाजातील स्वतःची प्रतिमा या स्वयंघोषित नेत्यांनी तपासून पाहावी, अशी खरमरीत टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली. तेे म्हणाले मी कोणाचीही तक्रार केली नाही. प्रांत, तहसीलदार यांच्या कार्यालयात कधी गेलो नाही, त्यांच्याशी कधी बोललो नाही. शेतकर्यांवर होणार्या अन्यायाविरुद्ध वकील संघटनेने जिल्हाधिकारी व वरिष्ठांकडे तक्रार व पत्रव्यवहार केला म्हणून प्रांत, तहसीलदार यांचे अधिकार काढले. पुन्हा प्रांतांना ते दिले.
भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणणार
तहसीलदार प्रशांत बेडसे व प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचा चुकीचा व भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणणारच असा इशारा मोहिते पाटील यांनी दिला. कागदपत्रांसह ज्यांच्याकडून काम करुन देण्यासाठी रकमा घेतल्या असे रिंग रोड बाधीत शेतकरी समोर बसवून येत्या आठ दिवसांत पुन्हा पत्रकार परिषद घेणार असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. तहसिलदार, प्रांत यांच्या विरोधात भरपुर पुरावे, योग्य वेळी योग्य ठिकाणी सादर करणार असल्याचे आमदार मोहिते यांनी सांगितले.
फोटो ः आमदार दिलीप मोहिते पाटील