कोरेगाव – भारत निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरु केलेली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दुबार नाव नोंदणीचे आणि समान मतदार आढळले असून संबंधितांनी त्यांना मिळालेल्या नोटीशीवरील पर्याय निवडून १ जानेवारी २०२४ पर्यंत दुरूस्ती करून घ्यावी, असे आवाहन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजीत नाईक व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी केले आहे.
भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहीत असणे आवश्यक आहे. मात्र काही मतदारांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असल्याचे आढळून आले आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान छायाचित्र व एका पेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना नमुना अ मध्ये नोटीस पाठविल्या आहेत.
या नोटीशीद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्याठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ईमेल पत्त्यावर आधारकार्डच्या झेरोक्स प्रतिसह अपलोड करावे किंवा संबधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.