विजयरणस्तंभ परिसरात पथकांडून कसून तपासणी
शिक्रापूर – एक जानेवारी २०२४ या शौर्यदिनी विजयरणस्तंभ परिसरात होणाऱ्या विजयरणस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची तयारी प्रशासनाकडून जोरात सुरु आहे. कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालेले आहे. कोरेगाव भीमासह पेरणे फाटा परिसरात बॉम्ब शोधक व नाशक पथके दाखल झाले आहेत. पथकांडून परिसरात कसून तपासणी करण्यात येत आहे.
कोरेगाव भीमा येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर प्रत्येक वर्षी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यावर्षी लाखोंच्या संख्येने नागरिक व समाजबांधव येथे मानवंदनासाठी उपस्थित राहणार आहेत.
विजयरणस्तंभ असलेला पेरणे गावचा भाग पुणे शहराच्या पोलीस ठाण्यात समाविष्ट करण्यात आलेला असल्याने पुणे आयुक्तालय येथून तर कोरेगाव भीमा येथे पुणे ग्रामीण पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
एक जानेवारीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा, सणसवाडी, पेरणे, लोणीकंद या ठिकाणी विशेष बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, विनायक जगताप, विजय पाटील, हनुमंत मोरे, नितीन गायकवाड यांच्या माध्यमातून श्वान जेम्सच्या सहकार्यातून विजयरणस्तंभ पथकाची कसून तपासणी करण्यात आली आहे. पथकांनी विजयरणस्तंभ परिसरात कसून तपासणी केली असल्यामुळे विशेष खबरदारी देखील घेण्यात येत आहे.