कराड – टेंभू, ता. कराड येथील धरणावरुन अँटीव्हॅक्युम व्हॉल्वमधील पितळी बुश चोरीप्रकरणी बापूराव रघुनाथ मदने (वय 36, रा. टेंभू, ता. कराड) याला कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, टेंभू योजना टप्पा 1 अ व 1 ब येथील पाण्याच्या पाइप क्रं. 1 ते 6 वरील 12 अँन्टीव्हॅक्युम व्हॉल्वमधील 12 पितळी बुश चोरीस गेल्याची फिर्याद दीपक गवारे यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणायची सूचना दिली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार सचिन निकम, उत्तम कोळी, सज्जन जगताप, नितीन येळवे यांनी बापूराव मदने याला अटक केली. त्याच्याकडून चार बुश आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, असा एकूण 78 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हवालदार उत्तम कोळी तपास करत आहेत.