खंडाळा – पशुसखींनी प्रशिक्षणादरम्यान विविध विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी चांगले मार्गदर्शन केले आहे. या मार्गदर्शनाचा लाभ स्वतःची आर्थिक उन्नती साधण्यासोबतच परिसरातील पशुपालक व कुक्कुट पालन करणार्या व्यावसायिकांना सहकार्य करण्यासाठी करावा, असे आवाहन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.अनिल भिकाने यांनी केले.
जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवळ, ता. खंडाळा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शेळी व कुक्कुट पालन सुधारणेसाठी पशुसखींचे कौशल्य विकास कार्यक्रम या प्रकल्पांतर्गत ‘शेळी व परसातील कुक्कुट पालन प्रशिक्षण’ या विषयावर आयोजित प्रशिक्षण समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिकाने बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मुकुंद आमलेे होते. प्रमुख अतिथी म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या स्मार्ट प्रकल्प समन्वयक डॉ. करगावकर, डॉ. निलेश खलाटे, विद्यापीठाचे या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सारिपुत्त लांडगे व डॉ. गितांजली ढुमे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.पचकोर दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, माहितीपुस्तिका व प्रथमोपचार पेटीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रकल्प सहसमन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. स्मिता कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. सहसमन्वयक डॉ.आकाश डोईफोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ.तेजस शेंडे यांनी आभार मानले. प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ. विजयसिंह लोणकर, डॉ. मिलीद नांदे, डॉ. साईनाथ भोकरे प्रशिक्षण संयोजक समिती सदस्य डॉ.कविता खिल्लारे, तसेच डॉ.नामदेव लटपटे, नितीन कदम, सौ. सुशिला काळे व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.