पुणे – राज्यात पहिली मराठी भाषा संवर्धन समिती नेमण्यासह, अंदाजपत्रकात भाषा संवर्धनासाठी विशेष तरतूद करण्याचा मान पुणे महापालिकेस मिळाला होता. मात्र, करोना संकटामुळे गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेकडून मराठी भाषा संवर्धनासाठी एकही उपक्रम राबविण्यात आला नव्हता.
मात्र, यंदा महापालिकेस मराठी भाषा संवर्धनासाठी वेळ मिळाला असून मराठी भाषा संवर्धन पंधरावड्यानिमित्त महापालिकेकडून शहरात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या पू.ल देशपांडे उद्यानात येत्या २५ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन असणार आहे.
या ठिकाणी शहरातील प्रकाशक, शासकीय प्रकाशन संस्थाचे सुमारे ५० स्टाॅल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी महापालिकेकडून अर्ज मागविण्यात आले असून २३ जानेवारीपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार असून प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. हे अर्ज प्रकाशकांना महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात देता येणार आहेत.