सातारा -जिल्ह्यात लंपी स्किनच्या प्रादुर्भावामुळे आठ तालुक्यांतील 59 गावांमध्ये 20 जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर 387 जनावरांना लंपी स्किन आजाराची बाधा झाली असून 77 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. जिल्ह्यात एकूण 95 हजार 988 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
जिल्ह्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव वाढला आहे. कराड, फलटण, सातारा, खटाव, कोरेगाव, पाटण, माण, खंडाळा या आठ तालुक्यांमध्ये लंपी स्किनची बाधित जनावरे आढळून आली आहेत. सध्या 290 जनावरांवर उपचार सुरु असल्याचे डॉ. शिंदे यांनी दिली. लंपी स्किनच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरातील 353 गावांमधील जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात एक लाख 25 हजार 677 जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.
आजअखेर 95हजार 988 जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून एक लाख 31 हजार 900 लस उपलब्ध आहेत. लंपी स्किनचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असला तरी त्याच गतीने पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करत आहे. पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.