दि.5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू, 100 विलगीकरण बेड तयार करणार
हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची जिल्हाधिकारी राम यांनी केली पाहणी
सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे रुग्णालय, अतिदक्षता विभागाची जबाबदारी
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या नवीन इमारतीत दि.5 एप्रिलपर्यंत 50 अतिदक्षता (आयसीयू) आणि 100 विलगीकरण बेड तयार होणार असून, याबाबतच्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी सोमवारी केली.
यावेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. हरीश ताटिया, डॉ. मुरलीधर तांबे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षता आणि विलगीकरण बेड्सची तयारी करण्यात येत आहे. ससून हॉस्पिटलची नवीन इमारत अकरा मजली असून, सहाव्या आणि नवव्या मजल्यावर “रिफ्यूजी एरिया’ आहे. इमारतीतील सर्वच मजल्यावर विलगीकरण बेड्सची सोय करण्यात येणार आहे.
सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे रुग्णालय आणि अतिदक्षता विभागाचे व्यवस्थापन ही जबाबदारी दिली आहे. पाहणीनंतर अधिष्ठाता कक्षात बैठक घेण्यात आली. बैठकीत इमारतीच्या इतर अनुषंगिक बाबींच्या उपलब्धतेवर चर्चा करण्यात आली. संपूर्ण इमारतीच्या वातानुकूलीन यंत्रणेसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर (जनित्र), जादा व्हेंटिलेटर, लॉकडाऊनमुळे उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने गतीने काम करणे यावर चर्चा झाली.
करोनाच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकारचे सर्वच विभाग सक्षमपणे काम करत असून, नवीन इमारतीत 700 हून अधिक बेड्स तयार करण्याचे आव्हान पूर्ण करू.
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी